नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदर लेखामध्ये आपण महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना जी शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली जात आहे ती योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे? त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम किती आहे? लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने होणार आहे? शेतीच्या क्षेत्रानुसार किती क्षमतेचा पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणार आहे? त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? आणि सर्वात शेवटी महत्त्वाचे म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? हे आपण सदर लेखांमध्ये पाहणार आहोत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी थोडक्यात…
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी हा आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री जागावे लागत होते त्यातून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असल्या कारणाने सरकारने ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार ३,५,७.५ अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैशाच्या स्वरूपात भरावी लागणारी रक्कम
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या १०% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या ५% रक्कम भरून सौर पंप संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम ही राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे:
- ३ एचपी क्षमतेचा पंप – १७,५०० ते १८,००० रुपये
- ५ एचपी क्षमतेचा पंप – २२,५०० रुपये
- ७.५ एचपी क्षमतेचा पंप – २७,००० रुपये
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी हा ५ वर्षाचा असणार आहे. सदर कालावधीत सौर कृषी पंपामध्ये कोणताही बिघाड झाल्यास विनामूल्य दुरुस्त करून देण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे त्या एजन्सीची राहणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये सौर पॅनलचे नुकसान झाल्यास किंवा सौर पॅनल ची चोरी किंवा तोडफोड झाल्यास सदर एजन्सी कडून विम्याचे संरक्षण ही मिळणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे:
१. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्त्रोत (शेततळे, बोअरवेल, विहीर) उपलब्ध आहे, पण ज्या ठिकाणी यापूर्वी कृषीपंपाकरता महावितरण कडून वीज पुरवठा करण्यात आला नाही असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
२. वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतकरी सदर योजनेसाठी पात्र असतील.
३. अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतीच्या क्षेत्रानुसार मिळणार सौर कृषी पंप
- २.५ एकरपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन असेल तर त्याला ३ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहेत.
- २.५ ते ५ एकरपर्यंत जर एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन असेल तर त्याला ५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे.
- ५ एकर पेक्षा जास्त जर शेतजमीन असेल तर सदर शेतकऱ्याला ७.५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
- ७/१२ उतारा (विहीर किंवा कुपनलिका शेतामध्ये असल्यास त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर आवश्यक) ७/१२ उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- अनुसूचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज कसा करायचा?
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्जदाराला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदार त्याच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतो. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत:
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://www.mahadiscom.in
- सदर वेबसाईटवर गेल्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल उजवीकडे वरती असलेल्या ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता.
- त्यानंतर तुम्हाला ‘लाभार्थी सुविधा’ या पर्यायावर जाऊन ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज ओपन होईल यात तुम्हाला पुढील माहिती भरायची आहे. १. याआधी कृषी पंप विज जोडणी प्रलंबित असेल तर तो तपशील २. अर्जदाराचा वैयक्तिक आणि त्याच्या जमिनीचा तपशील ३. कृषी तपशील ४. जलस्त्रोत आणि सिंचन माहिती ५. बँक तपशील ६. विद्यमान कृषी पंपाचा तपशील ७. आवश्यक कृषी पंपाचा तपशील इ. माहिती दिल्यानंतर त्याखाली असलेली घोषणापत्र व्यवस्थित वाचून त्या समोरील बॉक्समध्ये बरोबर चिन्हाची टिक करायची आहे.
- वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी ‘अर्ज सादर करा’ पर्यायावर क्लिक करायचे आहे.
वरील प्रमाणे तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता. सदर योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. सदर योजनेसाठी अर्ज तुम्ही कधीही करू शकता, अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही.
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज सादर केल्यानंतरची प्रक्रिया
अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील महावितरण करून पाठवला जाईल. हा लाभार्थी क्रमांक वापरून महावितरणच्या वेबसाईटवरील ‘अर्जाची स्थिती’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता, त्याचबरोबर तुम्हाला सौर कृषी पंपासाठी देय असलेली रक्कम भरून पुरवठा एजन्सीची निवड करू शकता.
सदर योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही निवडलेली एजन्सी आणि महावितरणचे कर्मचारी संयुक्तपणे तुमच्या शेतात येऊन माहितीची पडताळणी करतात. सर्व माहिती योग्य असेल तर तुम्ही सदर योजनेसाठी पात्र आहात की नाही हे ठरवले जाते आणि मग त्यानंतरच सौर पंप इन्स्टॉलेशन चे काम सुरू होते.
मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास त्याचबरोबर पंपामध्ये बिघाड झाल्यास किंवा पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास तुम्ही महावितरणच्या अधिकृत टोल फ्री नंबर वर संपर्क करू शकता.
टोल फ्री क्रमांक-१९१२/१९१२० किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५
सदर लेखामध्ये आपण राज्य शासनाच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!