नमस्कार, आजच्या लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्डवर कर्ज कसं घेता येते? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
1 फेब्रुवारी रोजी झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. अशी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तर पाहूया.
किसान क्रेडिट कार्ड विषयी थोडक्यात..
किसान क्रेडिट कार्ड भारत सरकारच्या कृषी धोरण अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) 1998 मध्ये योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहज आणि तात्काळ कर्जपुरवठा अल्प व्याजदराने करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे
किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? ते आपण खाली पाहूया:
- अल्प व्याजदरावर कर्ज मिळते.
- शेतकऱ्याला कर्जाची परतफेड त्याच्या उत्पन्नानुसार करता येते.
- किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत अनेक बँका पिक विमा यांचा लाभ देतात.
- शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी सहजपणे करता येते.
- नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जफेड न झाल्यास बँक कर्ज पुनर्गठन करून सवलत देऊ शकते.
- शेतकऱ्यांना ATM किंवा PSO द्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळते.
किसान क्रेडिट कार्ड कोठे मिळते?
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सरकारी, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा सहकारी संस्थांकडे अर्ज करावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. आपण खाली या दोन्ही पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा? हे पाहणारच आहोत.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी कर्ज मिळते. 5 वर्षांनी सदर कर्जाचे नूतनीकरण होते. शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डवर वर्षातून दोनवेळा व्याज भरावे लागते. त्याचबरोबर वर्षातून एकदा शेतकऱ्याला संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह जमा करावी लागते. मूळ जमा केलेली रक्कम शेतकरी दुसऱ्या दिवशी काढू शकतो.
वर्षातून दोनवेळा व्याज भरल्यानंतर आणि संपूर्ण कर्जाची रक्कम एकदाच जमा केल्यानंतर शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत सरकारकडून दिले जाणारे व्याज अनुदान मिळते. जर शेतकऱ्यांनी वर्षातून दोनदा व्याज आणि संपूर्ण खर्चाची रक्कम जमा केली नाही तर त्याला 7% दराने सदर खर्चाचे व्याज भरावे लागते. व्याज वेळेवर न भरल्यास खाते NPA (नॉन-परफॉर्मिंग असेट्स) देखील होऊ शकते.
किसान क्रेडिट कार्ड व्याजदरावर मिळणारे अनुदान
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ही रक्कम वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या खर्चाचा व्याजदर वार्षिक 7% आहे. परंतु शेतकऱ्यांना सरकारकडून सदर व्याजदरावर अनुदान दिले जाते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड केली तर त्यांना 3% व्याज अनुदान मिळते. म्हणजेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त 4% व्याजदराने वर्षभरासाठी 5% लाख रुपये कर्ज मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक पात्रता
किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्हाला काही अटी व शर्तीमध्ये पात्र होणे गरजेचे आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत हे आपण खाली पाहूया:
- किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असण्याबरोबरच तो शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची वही 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान असावे.
- कृषी व्यवसाय व्यतिरिक्त मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पशुपालन आणि फलोत्पादन व्यवसायामध्ये गुंतलेल्या शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्र आहेत.
- सामूहिक गट शेती करणारे, जमीन भाड्याने घेऊन शेती करणारे, संयुक्त कुटुंबातील शेतकरी सदर योजनेसाठी पात्र आहेत.
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करताना अर्जदाराला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यकता असते.
- ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
- पत्त्याच्या पुराव्यासाठी युटिलिटी बिले, (विज बिल, पाणी बिल, गॅस बिल इ.) रेशन कार्ड, आधार कार्ड
- जमिनीची कागदपत्रे यामध्ये 7/12 उतारा व 8-अ उतारा
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. आपण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहूया:
ऑफलाईन अर्ज
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा ग्रामीण बँकेत जावे लागेल.
- बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सदर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज
- किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करणार असाल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरून https://pmkisan.gov.in किंवा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड साठी बँकेची निवड करून सदर बँकेच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता.
- ऑनलाईन अर्ज करताना सदरच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा व आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून अर्ज व कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मंजूर केले जाते.
- किसान क्रेडिट कार्ड मंजुरीनंतर बँकेकडून क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाते आणि तुमचे किसान क्रेडिट कार्ड खाते उघडले जाते.
सदर लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज कसे घ्यायचे? याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा सदर योजनेअंतर्गत शेतीच्या खर्चासाठी कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकता. धन्यवाद!