Gay Gotha Anudan Yojana Maharashtra 2025
नमस्कार शेतकरी बांधवांनो, सदर लेखांमध्ये आज आपण महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली गाय गोठा अनुदान योजना 2025 विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण या योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, योजनेचे उद्दिष्ट, त्याचबरोबर योजनेचे नियम व अटी याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे पाहूया.
राज्यातील बहुतांश जनता ही शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून बहुतेक शेतकरी दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतलेले दिसत आहेत. यामुळेच सरकारकडून या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे गाय गोठा अनुदान होय. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे.
बहुतांश शेतकऱ्यांच्या कडे त्यांच्या जनावरांसाठी चांगला निवारण असल्यामुळे दुग्ध उत्पादनात घट होऊन त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. निवाऱ्याच्या अभावी जनावरे आजारी पडतात त्याचबरोबर ऊन, वारा, पाऊस यामुळे जनावरांचे हाल होते. परिणामी शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय संकटामध्ये येऊ शकतो. या कारणामुळेच सरकारकडून गाय गोठा अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट
शेतकऱ्याला त्याच्या जनावरांची गोठ्याच्या कमतरतेमुळे योग्य पालन पोषण करता येत नाही. त्यामुळेच त्यांना गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी सरकारकडून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे:
- गाय गोठा अनुदान योजनेतून शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- गोठा बांधणी केल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल.
- या योजनेच्या माध्यमातून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून देणे.
गाय गोठा अनुदान योजना पात्रता
गाय गोठा अनुदान योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत? ते आपण खाली पाहूया:
- गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ हा फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ एक कुटुंब एकदाच घेऊ शकते.
- या योजनेविषयी सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोठा बांधणीसाठी अनुदान घेतलेले असल्यास सदर व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याला देण्यात येणारी अनुदानाची रक्कम कशी ठरते? ते आपण खाली पाहूया:
- 2 ते 6 जनावरांसाठी या योजनेअंतर्गत ₹77,000 पर्यंत अनुदान दिले जाते.
- 6 ते 12 जनावरांसाठी या योजनेअंतर्गत ₹1,54,000 पर्यंत अनुदान दिले जाते.
- 12 ते 18 जनावरांसाठी या योजनेअंतर्गत ₹2,31,000 पर्यंत अनुदान दिले जाते.
- 18 पेक्षा जास्त जनावरांसाठी या योजनेअंतर्गत ₹3,00,000 पर्यंत अनुदान दिले जाते.
जनावरांच्या संख्येवर या योजनेअंतर्गत देण्यात येणारी अनुदानाची रक्कम ठरवली जाऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठ्याच्या लांबी आणि रुंदी बाबतचे नियम
गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्याला गोठा बांधणीसाठी काही नियम घालून दिले आहेत. सदर नियमांमध्येच गोठ्याची बांधणी करणे अनिवार्य आहे. हे नियम कोणते आहेत ते आपण खाली पाहू:
- गोठ्याची लांबी: 7.7 मीटर
- गोठ्याची रुंदी: 3.5 मीटर
- जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठीच्या टाकीची क्षमता: 200 लिटर
- जनावरांचे मूत्र साठवण टाकीची क्षमता: 250 लिटर
- जनावरांचा चारा ठेवण्यासाठीची जागा: 7 मीटर
गाय गोठा अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे
गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- शेतकरी असल्याचा दाखला
- पशुधन असल्याचा दाखला
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- शेतकऱ्याचा ७/१२ व ८-अ उतारा
- नरेगा (रोहयो) जॉब कार्ड
- गोठा बांधणी अंदाजपत्रक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू:
- सर्वप्रथम तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून सदर अर्जाची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे.
- त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करताना सदर अर्जावर सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या नावासमोर खूण करा.
- त्याखाली तुम्हाला ग्रामपंचायतचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे.
- अर्जदाराने त्याचे नाव, रहिवासी पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
- अर्जदाराला गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत ज्या प्रकारासाठी अर्ज करायचा आहे त्याला खूण करा.
- त्यानंतर अर्जदाराला त्याची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि अर्जदारला निवडलेल्या प्रकाराशी संबंधित कागदपत्राचा पुरावा जोडावा लागेल.
- जमीन लाभार्थ्याच्या नावावर असल्यास होय असे लिहा आणि ७/१२ आणि ८-अ व ग्रामपंचायत नमुना ९ जोडा.
- लाभार्थ्याला त्याचा ग्रामसेवक यांनी निर्गमित केलेला रहिवासी पुरावा जोडा.
- तुम्ही निवडलेला प्रकार ज्या ग्रामपंचायतीतून तुम्ही रहिवाशी आहात तिथून येत आहे का हे तुम्हाला निवडावे लागेल.
- लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे, हे सांगणारा ग्रामसभेचा ठराव आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र देखील लाभार्थ्यांनी अर्ज सोबत जोडावे.
- शेवटी लाभार्थ्याच्या अर्जाची व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर पंचायत समिती अधिकारी यांनी स्वाक्षरी केलेली पावती अर्जदाराला दिली जाईल.
अशाप्रकारे तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सादर करू शकता.
गाय गोठा अनुदान योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारी सर्व रक्कम ही नरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत वितरित केली जाते.
सदर लेखांमध्ये आपण गाय गोठा अनुदान योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचा दुग्ध व्यवसाय समृद्ध करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. धन्यवाद!