लाखो रुपयांची शिष्यवृत्ती! 10वी 12वी नंतर शिष्यवृत्तीसाठी कोणती योजना निवडावी? डॉ. आंबेडकर की राजर्षी शाहू स्कॉलरशिप

मित्रांनो, परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न आज अनेक गुणवंत आणि हुशार विद्यार्थी पाहतात. पण या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणं खूप गरजेचं असतं. अशावेळी महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) हा एक मोठा आधारस्तंभ ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेश शिक्षण शिष्यवृत्ती आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती या दोन्ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू काही सुवर्णसंधीच आहेत. या योजनांमुळे हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळवून आपलं भविष्य उज्वल केलं आहे.

पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या योजनांसाठी अर्ज करण्याची वेळ येते, तेव्हा अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक साहजिकच गोंधळात पडतात. आपल्यासाठी कोणती योजना अधिक फायदेशीर ठरेल? या योजनांमध्ये नेमका फरक काय आहे? माझं शिक्षण, जात आणि उत्पन्न कोणत्या योजनेच्या निकषांमध्ये बरोबर बसतं? असे अनेक प्रश्न मनात येतात.

हा सर्वात मोठा संभ्रम दूर करण्यासाठी आणि तुम्हाला सर्वात योग्य योजनेची निवड करण्यास मदत करण्यासाठीच आम्ही हा लेख तयार केला आहे. या लेखात आपण या दोन्ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती योजनांविषयी सखोल आणि तुलनात्मक माहिती घेणार आहोत. या योजनांचे उद्दिष्ट्ये, त्यांचे पात्रता व निकष, आर्थिक मदतीचे स्वरूप आणि अर्ज प्रक्रिया यामधील सर्वात महत्त्वाचे फरक समजून घेणार आहोत. जेणेकरून हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या शैक्षणिक ध्येयासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात योग्य निर्णय घेऊ शकाल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थी मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिष्यवृत्ती योजना ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये मास्टर्स (Masters) किंवा पी.एच.डी. (PhD) करायची आहे, त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जागतिक संधी देणे हा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क (Tuition Fees), त्यांचा राहण्याचा खर्च (निर्वाह भत्ता), विमानाचा प्रवास आणि विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा अशा सर्व मोठ्या खर्चांचा समावेश होतो. ही एक व्यापक (Comprehensive) आर्थिक सहाय्य योजना आहे.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील (Open Category), आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि मराठा (SEBC/EWS) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही राखीव प्रवर्गातून शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही, पण त्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची म्हणजेच पदव्युत्तर पदवी (Masters Degree) किंवा पी.एच.डी. (PhD) करण्याची इच्छा आणि पात्रता आहे, अशा विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एक मोठा आर्थिक आधार दिला जातो. या योजनेद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना परदेशातील टॉप विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी लागणारे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, तसेच विमानाचा प्रवास असे अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून विद्यार्थी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अगदी सहजपणे शिक्षण घेऊ शकेल.

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांची मुख्य उद्दिष्ट्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्तीची उद्दिष्ट्ये

  • अनुसूचित जाती व नव-बौद्ध प्रवर्गातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ही योजना सरकारमार्फत सुरू करण्यात आली.
  • या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा पीएचडी करण्यासाठी या योजनेमार्फत समान संधी उपलब्ध करून दिली जाते.
  • अनुसूचित जाती व नव-बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता आणखी मजबूत करणे आणि त्यांच्यात जागतिक स्पर्धेसाठी क्षमता निर्माण करणे.
  • विद्यार्थ्याने परदेशात शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग आपल्या भारत देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी व्हावा, हा या योजनेमागे मुख्य हेतू आहे.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची उद्दिष्ट्ये

  • ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही राखीव प्रवर्गातून परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
  • खुला/EWS/मराठा प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील (ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे) हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत परदेशामध्ये शिकण्याची संधी दिली जाते.
  • या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते.

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांसाठी लागणारे पात्रता निकष

या दोन्ही योजनांचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत, जे तुम्हाला योग्य योजना निवडण्यास मदत करतील:

  • मुख्य लाभार्थी (प्रवर्ग):
    • डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती: अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी (सामाजिक न्याय विभाग).
    • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती: खुला (Open), EWS आणि मराठा (SEBC/EWS) प्रवर्गातील विद्यार्थी (उच्च व तंत्रशिक्षण विभाग / सारथी).
  • कौटुंबिक उत्पन्न मर्यादा: दोन्ही योजनांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • किमान गुणांची अट: पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Masters) परीक्षेत किमान ५५% गुण आवश्यक आहेत.
  • शिक्षणाचा स्तर: दोन्ही योजना पदव्युत्तर पदवी (Masters) आणि पी.एच.डी. (PhD) साठी लागू आहेत.
  • विद्यापीठ रँकिंग (University Ranking): QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २०० च्या आत असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळवणे बंधनकारक आहे.
  • वयोमर्यादा (साधारणपणे): पदव्युत्तर पदवीसाठी ३५ वर्षे आणि पी.एच.डी. साठी ४० वर्षे.
  • रहिवासी: विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो, या योजनेमध्ये बहुतांश कागदपत्रे समान असली, तरी सर्वात महत्त्वाचा फरक हा प्रवर्ग सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांचा आहे. म्हणूनच सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक गोळा करून अर्ज भरा.

वैयक्तिक ओळखपत्र व रहिवासी पुरावे

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • डोमिसाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
  • वैध पासपोर्ट (Valid Passport)
  • पासपोर्ट फोटो

शैक्षणिक कागदपत्रे

  • दहावी आणि बारावीची मार्कशीट.
  • ग्रॅज्युएशनची गुणपत्रिका आणि डिग्रीचे सर्टिफिकेट.
  • मास्टर्सची गुणपत्रिका व प्रमाणपत्र (जर तुम्ही PhD साठी अर्ज करत असाल तर).
  • अनकंडिशनल ऑफर लेटर (Unconditional Offer Letter) (मित्रांनो, हे विद्यापीठ QS World Ranking २०० च्या आत असणे बंधनकारक आहे).
  • TOEFL / IELTS / GRE / GMAT यांसारख्या प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका.

आर्थिक कागदपत्रे

  • कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे).
  • पालकांचे मागील वर्षाचे आयटीआर (ITR) किंवा फॉर्म-१६ (Form-16).
  • बँकेचे पासबुक (तुमचे बँक खाते आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे).
  • सेल्फ-डिक्लरेशन/ॲफिडेविट (Self-Declaration/Affidavit).

दोन्ही योजनेनुसार लागणारी वेगवेगळी कागदपत्रे

  • डॉ. आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी (SC / नव-बौद्ध):
    • कास्ट सर्टिफिकेट (Caste Certificate)
    • कास्ट व्हॅलेडिटी सर्टिफिकेट (Caste Validity Certificate)
  • राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी (खुला / EWS):
    • EWS सर्टिफिकेट (EWS Certificate) (जर तुम्ही या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल आणि इतर कोणत्याही राखीव प्रवर्गाचा लाभ घेऊ शकत नसाल, तर तुम्हाला जात किंवा EWS प्रमाणपत्राची गरज नसते).

टीप: विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त एक सर्वसाधारण यादी आहे. प्रत्येक वर्षी अधिकृत जाहिरातीमध्ये कागदपत्रांच्या यादीत किरकोळ बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ तपासून नेहमी व्यवस्थितरित्या कागदपत्रांची छाननी करा आणि अर्ज करा.

अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया (Step-by-Step)

डॉ. आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी तसेच राजर्षी शाहू शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्यामधील महत्त्वाचा फरक मी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्समध्ये व्यवस्थितरित्या समजून सांगितला आहे.

  1. या दोन्हीही शिष्यवृत्तींचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  2. यानंतर वेबसाईटच्या होमपेजवरती तुम्हाला वेगवेगळ्या विभागांची यादी दिसेल, जी तुम्हाला परदेशी शिष्यवृत्ती देतात.
  3. आता तेथे तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार योग्य विभाग निवडायचा आहे. तर बघा, हाच अर्जामधील मुख्य फरक आहे.
  4. जर तुम्हाला डॉ. आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला Social Justice & Special Assistance Department या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  5. आणि जर तुम्हाला राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल, तर Higher and Technical Education Department या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  6. क्लिक केल्यानंतर आणि तुम्ही योग्य विभाग निवडल्यानंतर, हे महाराष्ट्र सरकारचे पोर्टल तुम्हाला त्या शिष्यवृत्तीच्या विशिष्ट विभागाच्या आणि स्वतःच्या शिष्यवृत्ती पोर्टलवरती घेऊन जाईल.
  7. आता त्या विशिष्ट पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी (Registration) करायची आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी ‘न्यू रजिस्ट्रेशन’ (New Registration) या बटणावर क्लिक करा.
  8. येथे तुमचा स्वतःचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) तयार करा. हा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, तसेच आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.
  9. त्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या लॉग इन (Login) करून तुमची प्रोफाइल पूर्ण भरायची आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक खात्याचे तपशील, तसेच शैक्षणिक माहिती व्यवस्थितरित्या भरावी लागेल.
  10. प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर ‘योजनेसाठी अर्ज करा’ या बटणावर क्लिक करा.
  11. मित्रांनो, तुम्ही ज्या विभागाच्या पोर्टलवरती आहात (उदाहरणार्थ, सामाजिक न्याय), त्या विभागाची परदेश शिष्यवृत्ती योजना आता तुम्हाला निवडायची आहे.
  12. आता मुख्य अर्ज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या परदेशी विद्यापीठाची माहिती भरायची आहे, जसं की अभ्यासक्रमाचे नाव, कालावधी, QS Ranking आणि यासोबतच Unconditional Offer Letter बद्दल तुम्हाला माहिती भरावी लागेल.
  13. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पोर्टलवरती पीडीएफच्या (PDF) स्वरूपात व्यवस्थितरित्या सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती आपण लेखात आधीच घेतली आहे. तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की उदाहरणार्थ, तुम्हाला आधार कार्ड, डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मार्कशीट, ऑफर लेटर हे सर्व स्कॅन करून अगदी व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे.
  14. संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड केल्यानंतर आणि तुमची वैयक्तिक माहिती अर्जामध्ये भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा पुन्हा तपासा. अर्ज बरोबर असल्यास ‘सबमिट’ (Submit) या बटणावर क्लिक करा.
  15. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट (Print Out) काढून तुमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवा. भविष्यामध्ये तुमच्या कामात पडेल.

विद्यार्थी मित्रांनो, माझी एक गोष्ट लक्षात असू द्या. हे पोर्टल जरी एक असले तरी सामाजिक न्याय आणि उच्च व तांत्रिक शिक्षण हे दोन्हीही पर्याय वेगवेगळे आहेत आणि हे तुम्हाला सुरुवातीलाच निवडायचे आहेत.

दोन्ही शिष्यवृत्तींबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मी या दोन्ही योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकतो का?

नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या दोन्ही योजनांचा एकाच वेळी लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या प्रवर्गासाठी (SC किंवा Open) असलेल्या केवळ एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता. शासनाच्या नियमानुसार एकाच उद्देशासाठी दोन वेगवेगळ्या सरकारी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येत नाही.

कोणत्या योजनेत जास्त आर्थिक लाभ मिळतात?

या दोन्ही योजनांचे आर्थिक लाभ बघितले तर जवळपास सारखेच आहेत आणि अत्यंत व्यापक आहेत. दोन्ही योजनांमध्ये साधारणपणे शिक्षण शुल्क, तसेच निर्वाह भत्ता, विमानाचा प्रवास खर्च आणि आरोग्य विमा दिला जातो.

दोन्ही योजनांसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा (Income Limit) सारखीच आहे का?

होय विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीही योजनांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असायला हवे. म्हणजेच दोन्हीही योजनांची कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ही जवळपास सारखीच आहे.

दोन्ही योजनांसाठी किमान गुणांची अट (Percentage) काय आहे?

होय विद्यार्थी मित्रांनो, ही अट सुद्धा दोन्ही योजनांसाठी समान आहे. अर्जदाराला ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स परीक्षेत ५५ टक्के गुण मिळाले असतील तर अर्जदार या योजनेसाठी अगदी सहज पद्धतीने अर्ज करू शकतो. पण काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अभ्यासक्रमासाठी किंवा विद्यापीठांसाठी या अटींमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नवीन जाहिरात पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page

×